
प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, घोटी बु. दि. १५ ऑक्टोबर २०२६):भारताचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (मुले नंबर २), घोटी बु येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक हात धुवा दिन’ म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या दुहेरी औचित्याने आयोजित कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या ऐतिहासिक ‘आशा किरणवाडी’ भेटीच्या २१ वर्षांपूर्वीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी थेटे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार शिवनाथ घोटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक आठवण सांगितली. ते म्हणाले की, २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १५ ऑक्टोबर २००५ रोजी डॉ. कलाम यांनी राष्ट्रपती पदावर असताना आपल्या वाढदिवशी घोटी जवळील दुर्गम आदिवासी पाड्याला भेट दिली होती. तीव्र पाणीटंचाईमुळे पूर्वी या पाड्याला ‘वैतागवाडी’ म्हटले जायचे, मात्र डॉ. कलाम यांच्या भेटीनंतर आणि प्रेरणेने गावाला ‘आशा किरणवाडी’ हे नवीन नाव मिळाले. त्यानंतर केंद्र सरकार आणि ‘बायफ’ (BAIF) संस्थेच्या माध्यमातून फळबाग व पाणी योजना राबवून हे गाव आज पूर्णपणे स्वयंपूर्ण बनले आहे.
हा प्रेरणादायी इतिहास ऐकून विद्यार्थी भारावून गेले होते.या सोहळ्यात सौ. सुनीता अहिरे मॅडम, श्री. संजय भांगरे सर आणि सौ. रेखा थेटे मॅडम यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणांतून त्यांना आदरांजली वाहिली.याच कार्यक्रमादरम्यान ‘हात धुणे दिना’चे औचित्य साधत श्रीमती बारे मॅडम, सौ. ज्योती कोळी मॅडम, श्रीमती शीला गातवे मॅडम आणि श्रीमती नीलिमा धस मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागरूक करत हात धुण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. जनार्दन खादे सर यांनी केले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रियंकाताई चव्हाण, माता पालक, अंशकालीन निदेशक श्री. बच्छाव सर, श्री. रंधवे सर, श्री. क्षीरसागर सर, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
