
इगतपुरी: प्रतिनिधी शिवनाथ घोटकर, पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संचलित नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जैन भवन, घोटी (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना कराव्या लागणाऱ्या संघर्षावर आणि त्यांच्या उपेक्षित जगण्यावर या संमेलनात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, राज्यभरातून पत्रकार या सोहळ्यासाठी एकत्र येणार आहेत.
हे संमेलन दोन सत्रात संपन्न होणार असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:पहिले सत्र: उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन व पुरस्कार वितरणसकाळी १०:३० वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या उद्घाटन सत्राचे उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री मा.श्री.गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विनोद पत्रे असतील. याप्रसंगी माजी क्रीडा राज्यमंत्री मा.श्री. गुलाबराव गावंडे, आमदार मा.श्री.हिरामण खोसकर, दैनिक देशदूतचे संपादक मा.श्री.शैलेंद्र तनपुरे, पत्रकारांचे अध्यापक मा.श्री.श्रीकांत सोनवणे सर आणि नाशिकचे उपमहापौर मा.श्री.विलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.याच सत्रात “ग्रामीण पत्रकारांचे उपेक्षित जगणे” या विषयावर विशेष १२ पानी स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल. तसेच, ज्येष्ठ पत्रकार दिवंगत भोर गुरुजी यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६ घटकांचा विशेष सन्मान केला जाणार आहे:• दुगाव ग्रामपंचायत (मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध ग्राम योजनेत नाशिक विभागात प्रथम)• मा.श्री.देवचंद महाले (आदिवासी संस्कृती, परंपरा व निसर्ग संवर्धन)• मनोज कामडी, जव्हार (सामाजिक व विकास पत्रकारिता सन्मान)• बंटी पगारे (स्वच्छता दूत)• हिरडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील महिला शेतकरी (नैसर्गिक शेतीतून महिला संघटन)• प्रल्हाद पवार, जातेगाव (ता. त्र्यंबकेश्वर) (निसर्ग व पक्षी संवर्धन)
दुसरे सत्र: व्याख्यान, ठराव व खुली चर्चादुपारी १:३० ते ३:३० दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन पत्रकारांचे अध्यापक मा.श्री.श्रीकांत सोनवणे करतील. या सत्रात समितीचे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राम खुर्दळ यांचे “ग्रामीण पत्रकारांची उपेक्षा” या विषयावर विशेष व्याख्यान होईल. या सत्रात ग्रामीण भागातील कष्टकरी पत्रकारांच्या मूलभूत समस्या, आर्थिक असुरक्षितता आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर महत्त्वाचे ठराव मंजूर केले जातील. त्यानंतर उपस्थित पत्रकारांमध्ये खुली चर्चा आणि संवाद होईल.
संयोजन समितीचे परिश्रमया भव्य राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाच्या नियोजनासाठी समितीचे राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ, विभागीय अध्यक्ष माया मुक्ताई, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील वाघ, जिल्हाध्यक्ष देवचंद महाले, उपाध्यक्ष अरुण भोर, भारत चव्हाण, संघटक शिवाजी जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष सुनिल डी.पगारे, सचिव शिवनाथ घोटकर, निफाड तालुकाप्रमुख प्रदीप कापसे, त्र्यंबक तालुकाध्यक्ष पांडुरंग दोंदे, राजू भांड, शंकर निबारे, वाल्मिक ठोंबरे, मुकुंद आव्हाड आणि अश्विनी धुळे हे विशेष परिश्रम घेत आहेत. तरी या संमेलनाला पत्रकार बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
