माणिकखांब येथे रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या आदिवासी युवकाला वंदे भारत एक्सप्रेसमधून तातडीने उपचारासाठी दाखल; रेल्वे प्रशासनाची मानवी सहानुभूती ठरली कौतुकास्पद,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर, माणिकखांब परिसरातील आदिवासी वाडीवरील रहिवासी असलेले श्री. विठ्ठल गांगड यांचा रेल्वे रुळावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली. अपघात घडला तेव्हा ते जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर, स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने प्रसंगावधान राखत त्यांच्या उपचारासाठी एक अनोखा व अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला.गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल गांगड यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवणे गरजेचे होते, परंतु वाहतुकीच्या अन्य साधनांचा विलंब टळण्यासाठी मार्गावरून धावणाऱ्या अत्यंत वेगाने जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला विनंती करण्यात आली. या आपत्कालीन परिस्थितीत मानवी दृष्टिकोन ठेवत रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि वंदे भारत गाडी माणिकखांब येथे थांबवण्यात आली.सुमारे ३० मिनिटे ही द्रुतगती रेल्वे गाडी या आपत्कालीन परिस्थितीसाठी थांबवून ठेवण्यात आली, ज्यामध्ये जखमी विठ्ठल गांगड यांना उपचारासाठी सुखरूप आत बसवण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे जखमी युवकाला वेळेत वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाच्या या मानवी निर्णयाचे मोठे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *