बैल अजूनही येतात, पण तो लळा अन् तो शनिवार हरवला… बैलपोळ्याच्या दिवशी घोटीच्या बाजाराची भावनिक साद,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर. घोटी बु, दि.१०/०९/२०२६,घोटी बु, ता.इगतपुरी जि.नासिक “शेतकऱ्याचा खरा श्वास आणि ग्रामीण संस्कृतीचा प्राण असलेला बैलपोळा आला की, घोटीच्या त्या ऐतिहासिक शनिवारची आणि बळीराजाच्या सोबत्यांची आठवण अधिकच तीव्र होते.”घोटीचा बैल बाजार म्हणजे नुसता खरेदी-विक्रीचा व्यवहार नव्हता, ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांची पंढरी होती. शनिवार उजाडला की घोटी शहराचे रूपच पालटायचे.

पहाटेपासून खिल्लार, देवणी, लाल कांधारी बैलांच्या जोड्या घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी, चहाची टपरी, वाफाळलेल्या भजीची गाडी, जनावरांचे चामड्याचे शोते आणि रंगीबेरंगी कासरे यामुळे या आठवडे बाजाराला खऱ्या अर्थाने जत्रेचे स्वरूप यायचे. इथे केवळ बैलांचा सौदा होत नव्हता, तर माणसांची मने जुळायची. जुनी पिढी अभिमानाने सांगायची, “शनिवारी घोटीला गेलो नाही, तर करमतच नाही!”पण काळ बदलला तसे चित्रही पालटले. ट्रॅक्टर आले आणि बैल मागे पडले.

शेती परवडेनाशी झाल्याने आज याच बाजारात बैलांऐवजी मोजक्या बकऱ्या आणि ओस पडलेली मैदानं दिसतात. पूर्वी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालणारा हा बाजार आता जेमतेम काही तासांत उरकला जातो. बैलाच्या गळ्यातली वाजत जाणारी घुंगरांची साखळी, दलालांची खणखणीत बोली आणि हातावर हात मारून ठरलेला विश्वासाचा तो सौदा आज कुठेतरी हरवून गेला आहे.

आज बैलपोळ्याचा सण आहे. आजच्याच दिवशी बाशिंग बांधलेल्या, पाठीवर थाप पडून पुरणपोळीचा नैवेद्य खाणाऱ्या त्या मुक्या मित्रांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जरी आता ते दिवस आणि ती बैलं या मातीत पूर्वीसारखी दिसणार नसली, तरी घोटीचा हा ऐतिहासिक बैल बाजार पूर्णपणे संपू नये. कारण तो केवळ व्यवहाराचे ठिकाण नाही, तर तो बळीराजाच्या घामाचा आणि इमानाचा जिवंत साक्षीदार आहे. नवीन पोरांना सांगा, चार जनावरांचा राहिला तरी चालेल, पण आपली मातीची ही संस्कृती आणि घोटीचा बैल बाजार टिकलाच पाहिजे, (शब्दांकन:श्रीराम तोकडे,)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *