
प्रतिनिधी-:शिवनाथ घोटकर, घोटी बु. दि.०६/०९/२०२६, इगतपुरी तालुका ही सह्याद्रीच्या कुशीत वसलेली एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. पावसाळा सुरू झाला आणि निसर्गाने हिरवा शालू पांघरला की, येथील बाजाराचे रूपच पालटते. आदिवासी बांधव, प्रामुख्याने आदिवासी महिला, आपल्या जंगलातील संपत्ती म्हणजेच रानभाज्या विकण्यासाठी या मुख्य बाजारपेठेत आवर्जून येतात.चाईचा देठ, चाईचा मोहर, करटुले, मेका, चिचुंरड, खुरास्णी, पेरा आणि तांदूळका अशा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणाऱ्या रानभाज्या या बाजाराची खरी ओळख बनतात.
पावसाळ्याच्या दिवसांत आणि विशेषतः भाद्रपद महिन्यात मिळणाऱ्या या भाज्या गोळा करण्यासाठी आदिवासी महिलांना जंगलात मोठी पायपीट करावी लागते. निसर्गाचे हे अनमोल देणे ते मिळेल त्या जागेवर पसरून बसतात आणि दहा-वीज रुपयांच्या ग्लासाच्या मापाने हे रानमेवे अत्यंत आपुलकीने विकतात.हा केवळ व्यवसाय नसून, आदिवासी संस्कृती आणि निसर्गाचे एक अनोखे नाते आहे.
आधुनिक जगात जिथे सर्व काही पॅकबंद आणि महाग मिळत आहे, तिथे हे श्रम करणाऱ्या हातांची साधी माणसे आपल्या मातीतील समृद्ध वारसा अत्यंत कमी किमतीत लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या या कष्टामागे पोटाची खळगी भरण्याची धडपड असतेच, पण त्यासोबतच जंगलाचे रक्षण करत तो वणवा जपण्याचे त्यांचे प्रेमही दिसून येते. या रानभाज्या विकताना त्यांच्या चेहऱ्यावर असणारी नखशिखांत प्रामाणिकपणाची ओढ आणि जगण्याची जिद्द मनाला हेलावून टाकणारी असते. इगतपुरीच्या बाजारात फिरताना या आदिवासी भगिनींच्या कष्टांना आणि त्यांच्या अस्सल संस्कृतीला दिलेली साधी दाद म्हणजे आपल्या मातीशी जोडले जाण्याची खरी अनुभूती आहे.
