‘मिशन ग्रीन मान्सून २०२६’: वाकी-बिटोरली परिसर हिरवाईने बहरणार; समसोनाईट कंपनीचा वृक्षारोपणासाठी पुढाकार,

बातमी शेअर करा.

प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर.घोटी बु,
वाकी-बिटोरली:’उन्नत आपल गाव’ या संकल्पनेतून वाकी-बिटोरली गाव निसर्गाने संपन्न करण्यासाठी समसोनाईट कंपनीने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गावास हरित आणि समृद्ध करण्यासाठी भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.

🔹पर्यावरण संवर्धनाचा संकल्प,🔹
गावातील शासकीय गायरान जागेवर आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योतीताई केदारे म्हणाल्या की, “हे केवळ एक वृक्षारोपण नसून पर्यावरण संवर्धनाची एक मोठी चळवळ आहे. प्रत्येक ग्रामस्थाने यात सहभागी होऊन आपल्या गावाला हिरवेगार ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.”

ही मोहीम म्हणजे केवळ झाडे लावण्यापुरती मर्यादित नसून, निसर्गस्नेही समाज घडवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. भावी पिढ्यांना स्वच्छ आणि समृद्ध वाकी-बिटोरली मिळावी, या उद्देशाने हा प्रेरणादायी संकल्प हाती घेण्यात आला आहे.

🔹दिग्गजांची उपस्थिती,🔹
या उपक्रमास समसोनाईट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग नोंदवला. यामध्ये समसोनाईटचे इंडिया हेड (नाशिक) जय कृष्णन, प्लांट हेड (नाशिक) पंकज चावला आणि बॅगझोनचे इंडिया हेड आयुष तैनवाला यांचा समावेश होता. तसेच मुंबई आणि नाशिक कार्यालयातील अधिकारी, गोंडे दुमाला येथील समसोनाईट व बॅगझोनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत वाकी-बिटोरलीचे माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला बचत गटाच्या महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *