
प्रतिनिधी: शिवनाथ घोटकर, घोटी बु, इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज, शनिवार (दि. २५ जुलै) आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई–आग्रा महामार्गालगत आणि निसर्गरम्य दारणा नदीच्या किनारी असलेल्या या मंदिरात सकाळी ६.०० वाजता महाआरती सोहळा पार पडणार आहे.
आषाढी एकादशीच्या या पवित्र पर्वावर मंदिर परिसरात जय हरी विठ्ठलाच्या जयघोषात विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. महाआरतीनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी विशेष फराळ प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
माणिकखांबसह पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन समस्त चव्हाण बंधू पाटील परिवार, माणिकखांब यांच्या वतीने करण्यात आले आहे.
