महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आगरी सेना आक्रमक; इगतपुरी तालुक्यातील वीज समस्यांवर तीव्र आंदोलनाचा इशारा,

बातमी शेअर करा.

इगतपुरी: प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर, दि.१७/०९/२०२६.रोजी,इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जीर्ण वीजखांब आणि प्रलंबित नवीन वीज जोडण्या यांमुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्या तातडीने सोडवण्याच्या मागणीसाठी ‘आगरी सेना इगतपुरी तालुका’च्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

तालुक्यातील शेती आणि दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विजेवर अवलंबून आहेत. मात्र, अवेळी होणारे भारनियमन (लोड शेडिंग), कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा आणि तासन्तास वीज गायब असणे यांमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. रात्रीच्या वेळी अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. तसेच अनेक गावांत लोंबकळणाऱ्या धोकादायक वीजतारा आणि जीर्ण खांब नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत.गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान सायंकाळऐवजी सकाळी किंवा दुपारी लोड शेडिंग करण्यात यावे. ग्रामीण भागातील बारंवार खंडित होणारा वीजपुरवठा थांबवून शेतीपंपांना शासनाच्या नियमानुसार पुरेशा दाबाने वीज मिळावी.

तालुक्यातील जीर्ण वीजखांब व लोंबकळणाऱ्या तारांचे सर्वेक्षण करून नवीन खांब बसवण्यात यावेत. घरगुती व कृषी वापराच्या प्रलंबित वीज जोडण्या त्वरित मंजूर कराव्यात, तसेच अपुऱ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बदलून अधिक क्षमतेचे बसवण्यात यावेत. तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी इगतपुरी तालुक्यात विशेष तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी.विद्युत पुरवठ्याचा प्रश्न हा शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जीवन-मरणाचा विषय बनला आहे. महावितरण प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांवर केलेली लेखी कार्यवाही त्वरित सादर करावी, अन्यथा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा आगरी सेना इगतपुरी तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *