प्रतिनिधी:- शिवनाथ घोटकर,घोटी बु, दि.२१/०६/२०२६.रोजी,झाडे लावा, झाडे जगवा हे केवळ कागदावर किंवा घोषवाक्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आज निर्माण झाली आहे. याच विचारातून इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे एक अनोखा आणि अत्यंत प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक संतोष गोविंद उन्हवणे यांनी आपल्या स्वर्गीय आई येणुबाई गोविंद उन्हवणे यांच्या अस्थींचे नदीत विसर्जन न करता, त्यावर शेतात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा एक नवा पायंडा पाडला आहे.नदी विसर्जनाला फाटा, शेतात वृक्षारोपणसाकुर येथील रहिवासी असलेल्या येणुबाई गोविंद उन्हवणे यांचे रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी, वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पारंपरिक पद्धतीने अस्थींचे नदीत विसर्जन करण्याऐवजी, निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखून उन्हवणे कुटुंबाने एक क्रांतीकारी निर्णय घेतला. त्यांनी आईच्या अस्थी स्वतःच्या शेतात टाकल्या आणि त्यावर स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण केले. “झाडे लावा – झाडे जगवा” प्रत्यक्ष कृतीत: मनोज मोरे गुरुजीअस्थी पूजनानंतर कालकथित येणुबाई यांना आदरांजली अर्पण करताना बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक मनोज मोरे गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,> “भविष्यात वातावरणाचा नैसर्गिक समतोल राखणे ही काळाची मोठी गरज आहे. ‘झाडे लावा – झाडे जगवा’ हे केवळ तोंडचे घोषवाक्य न राहता, प्रत्येकाने ते प्रत्यक्ष कृतीत उतरवले पाहिजे. समता सैनिक संतोष उन्हवणे यांनी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ अस्थींवर वृक्षारोपण करून समाजासमोर एक आदर्श संकल्पना कृतीतून साकारली आहे.” उन्हवणे परिवाराची उपस्थितीया कौतुकास्पद आणि भावूक प्रसंगी उन्हवणे व पगारे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कालकथित येणुबाई यांचे पती गोविंद पुंजा उन्हवणे, मुलगा संतोष गोविंद उन्हवणे, सून कीर्ती उन्हवणे, तसेच मुली छाया मदन पगारे, शोभा भारत भालेराव, मंगल दिलीप झनकार, शारदा बाळू कर्डक, शीला विनोद ताठे व आशा तानाजी भरीत उपस्थित होत्या.याशिवाय बहिणीचा मुलगा राजू लक्ष्मण पवार, जावई मदन भीमराव पगारे, दिलीप हरी झनकार, बाळू नामदेव कर्डक, विनोद रमेश ताठे, तानाजी बाळू भरीत, तसेच नातवंडे प्रभात भारत भालेराव, श्रावण रवींद्र बर्वे, सम्यक संतोष उन्हवणे, अनुष्का संतोष उन्हवणे, प्रज्ञा संतोष उन्हवणे आणि रमेश विनोद ताठे यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणाच्या या पवित्र कार्यात सहभाग घेतला.एक झाड म्हणजे एक जीवन – स्मृती जपा, निसर्ग वाचवा” हा संदेश देणारा हा उपक्रम सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
