
इगतपुरी:प्रतिनिधी-:शिवनाथ घोटकर, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-3) गोंदे दुमाला ते पिंप्री फाटा दरम्यान पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, अस निवेदन आगरी सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
याबाबत आगरी सेनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष हरीष चव्हाण आणि नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष कडू यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार तसेच स्थानिक आमदार हिरामण खोसकर यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनाप्रमुख मुद्दे व समस्या:
- जीवघेणे खड्डे: राष्ट्रीय महामार्गावर गोंदे दुमाला ते पिंप्री फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्यामुळे वाहनचालकांना त्यांची खोली अंदाज येत नाही.
- अपघातांचा धोका: या मार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी, पादचारी, रुग्णवाहिका आणि इतर वाहनधारकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
- टोल वसुली सुरू पण सुविधा नाही: टोल प्रशासनाकडून नियमानुसार हायवेवर रुग्णवाहिका किंवा पुरेशा गस्तीची (पेट्रोलिंग) कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मात्र, असे असतानाही वाहनधारकांकडून सक्तीने आणि मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केली जात आहे. नागरिकांमध्ये या कारभाराबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे.
🔹प्रशासनाला आंदोलनाचा इशारा,🔹
आगरी सेनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. NH-3 वरील गोंदे दुमाला ते पिंप्री फाटा दरम्यानचे सर्व खड्डे त्वरीत बुजवून रस्ता दुरुस्तीचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. जर लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ता सुरळीत केला नाही, तर तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
या शिष्टमंडळात आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष हरीष चव्हाण, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष कडू, इगतपुरी शहराचे माजी नगरसेवक संपत डावखर, गणेश कडू, अनिल भोपे, नारायण वळकंदे, देवराम म्हसणे, लालु दुभाषे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
