लेखन - आयु. मनोज मोरे गुरुजी , केंद्रीय शिक्षक (भारतीय बौद्ध महासभा)
भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा इतर पारंपरिक धर्मांच्या कर्मसिद्धांतापेक्षा अधिक वास्तववादी, स्वतंत्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आहे. इतर धर्मांमध्ये कर्माचे फळ पूर्वजन्म, दैव किंवा अदृश्य शक्तींवर अवलंबून ठेवले जाते; परंतु बुद्धांनी कर्म व कर्मविपाक यांचा परिपाक “कारण आणि परिणामाच्या” नैसर्गिक नियमावर आधारलेला सांगितला. कर्म म्हणजे काया, वाचा आणि मनाने केलेले संकल्पित क्रियाशील व्यवहार असून त्याचा परिणाम हा तात्काळ, काही काळाने अथवा अनिश्चित काळानंतर मिळतोच, असे बुद्ध सांगतात. त्यामुळे त्यांचा कर्मसिद्धांत अंधश्रद्धेपासून दूर, आत्मनिरपेक्ष, आणि वैज्ञानिक नियमांशी सुसंगत आहे.
बुद्धांचा धम्म सदाचार, शील आणि चित्तशुद्धीवर आधारलेला आहे. त्यांनी मानवाला १० कुशलकर्मे करण्याची शिकवण दिली – कायिक (शरीराने) : हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार टाळणे; वाचिक (वाणीने) : सत्य बोलणे, चहाडी न करणे, मृदूभाषी असणे, मौन राखणे; आणि मानसिक : राग न करणे, निस्वार्थपणा व आदरभाव ठेवणे. ही सर्व कर्मे व्यक्ति आणि समाजाच्या मानसिक, सामाजिक आणि नैतिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. शीलपालनातून सुख, समाधान आणि सन्मान मिळतो. बुद्धांचा कर्मसिद्धांत मानवाला विवेकशील, सुसंस्कृत, निर्भय आणि आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरित करतो.
जर संपूर्ण मानवजातीने बुद्धांच्या कर्मसिद्धांतानुसार जीवनपद्धती स्वीकारली, तर समाजात समता, बंधुता, करुणा आणि मैत्री निर्माण होईल. कोणालाही नुकसान न पोहोचवता कौटुंबिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच कर्मसिद्धांताच्या मार्गावर चालत समाजासाठी त्याग व परिश्रम केले आणि त्यांच्या त्या ‘कर्माचे फळ’ आज समाजाला मिळते आहे. एक कवी म्हणतो – “नव्हतं मिळत पोटाला, आज कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई, अंगठी सोन्याच्या बोटाला.” हेच बुद्धांचे कुशलकर्मांचे जिवंत उदाहरण आहे, असे प्रवचनकार केंद्रीय शिक्षक मनोज मोरे गुरुजी यांनी आपल्या प्रवचनात सांगितले.
