अवकाळा की पाऊसकळा? – शेतकऱ्यांच्या संकटांवर सरकारचे मौन

बातमी शेअर करा.

लेखन: नंदू भाऊ पगारे, वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता – नाशिक ग्रामीण

मे महिना सुरू झाला की उन्हाच्या तीव्र झळा जाणवायला हव्या, पण यंदा हवामानानेच विपरित खेळी केली. सहा मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले आहे. इगतपुरी तालुका भाताचा प्रमुख आगार मानला जातो. मात्र यंदा पूर्व मशागत करायला वेळ मिळालाच नाही. परिणामी “धूळपेर”साठी आवश्यक असलेली नैसर्गिक वाफच मिळाली नाही.

बाजारातून उदार उसनवार करून, चढ्या दराने बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, पण पावसाने उघड न दिल्यामुळे सारा पेरा वाया गेला. शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे आणि ते संकट अजूनही कायम आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त शेतकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात, मात्र यावर्षी पावसामुळे आधी पेरणी आणि मगच वारी अशी उलटीच प्रक्रिया घडली. पावसाच्या या अनियमिततेने आणि शासकीय दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे.

बाजारात बियाणे महाग, खताचा तुटवडा, युरिया खत घ्यायचे तर दुकानदार दाणेदार किंवा झिंक घेण्याची अट घालतात. गरीब शेतकरी नाईलाजाने सगळं खरेदी करतो. एकीकडे काम नाही, दुसरीकडे शेतीमालाला भाव नाही – अशा दुहेरी संकटात शेतकरी अक्षरशः अडकला आहे.

गेल्या दोन वर्षांत सहकारी संस्था आणि बँका शेतकऱ्याला पाठबळ देण्यात अपयशी ठरल्या आहेत. ना सन्माननीय आमदारांकडून, ना स्थानिक सहकार नेत्यांकडून कुठलाही ठोस प्रतिसाद मिळत नाही. यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.

गेल्या दोन वर्षांत सहकारी संस्था आणि बँका शेतकऱ्याला पाठबळ देण्यात अपयशी ठरल्या आहेत. ना सन्माननीय आमदारांकडून, ना स्थानिक सहकार नेत्यांकडून कुठलाही ठोस प्रतिसाद मिळत नाही. यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नाशिक ग्रामीण प्रवक्ते नंदू भाऊ पगारे यांनी शासन व प्रशासनाला आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांच्या संकटांवर गंभीरपणे लक्ष द्यावे. विशेषत: बियाणे, खत व औषधांबाबत शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा “भक्ती करू का पोट भरू?” हा प्रश्न शेतकऱ्याच्या जगण्यात ठळक बनणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *