हरीश तूपलोंढे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी): देशातील कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात आज, ९ जुलै २०२५ रोजी, नाशिकमध्ये जोरदार एल्गार झाला. हुतात्मा कान्हेर मैदानावर सकाळी ९:३० वाजता हजारोंच्या संख्येने कामगार, कर्मचारी आणि कष्टकरी वर्ग एकवटले. केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र क्षेत्रीय संघटनांच्या संयुक्त मंचाने पुकारलेल्या देशव्यापी सार्वत्रिक संपात नाशिकने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कामगारांचे हक्क हिरावून घेणाऱ्या चार नव्या श्रमसंहितांच्या अंमलबजावणीविरोधात आणि विविध ज्वलंत मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. “कामगार नाही, तर विकास नाही” अशा जोरदार घोषणांनी नाशिकचा परिसर दुमदुमून गेला.
मोर्चात मांडलेल्या प्रमुख मागण्या:
🔸 कामगारविरोधी चार श्रमसंहितांचा तात्काळ रद्दबातल करा, व नव्याने कामगारहिताचे कायदे लागू करा
🔸 कामाच्या तासात वाढ नको, निश्चितकालीन रोजगार धोरणाला विरोध🔸 कंत्राटी, हंगामी, मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करा, समान वेतन व हक्काचे लाभ द्या🔸 किमान ₹३०,००० मासिक वेतन, ₹१०,००० पेन्शन, ईएसआय आणि पीएफ लागू करा🔸 सर्वांसाठी रोजगार किंवा बेरोजगारी भत्ता द्या, रोजगार निर्मितीसाठी ठोस योजना राबवा🔸 सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा, रेल्वे, विमा, संरक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक रोखा
नाशिकमधील विराट मोर्च्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या श्रम धोरणांना जोरदार विरोध नोंदवण्यात आला. हजारो कामगारांनी निषेध फलक, बॅनर्स आणि घोषणाबाजीसह आपली ताकद दाखवली. मोर्चा शांततेत पार पडला असून पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलनाचे संकेतही संघटनांनी दिले आहेत.
🛑 “हे केवळ आंदोलन नाही, तर हक्कांचा पुकारा आहे” अशा शब्दांत सहभागी संघटनांनी सरकारला इशारा दिला.
