इगतपुरी तालुक्यात गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा आज (१० जुलै) भीषण अपघात झाला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव फाट्याजवळ सिमेंट पावडर घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरने भाविकांच्या इको वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातात ठार झालेल्यांची नावे:दत्ता आम्रे,नित्यानंद सावंत,विद्या सावंत,मीना सावंत(सर्व राहणीवासी – चार बंगला, अंधेरी, मुंबई)
प्राप्त माहितीनुसार, भाविकांचे इको वाहन दर्शन करून परतीच्या मार्गावर होते, तेव्हाच मागून आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की वाहन काही मीटर फरफटत नेले गेले. यात वाहनातील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह गाडीखाली अडकले होते, त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी घोटी पोलीस, महामार्ग पोलीस व टोल नाक्याच्या टीमने तत्काळ धाव घेतली असून, महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
हे भाविक इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील प्रसिद्ध रामदास बाबा मठात गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आले होते. दर्शन करून मठातून परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवाशांनी व वाहनचालकांनी महामार्गावर अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
