माणिकखांब (ता. इगतपुरी) –”रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी…” अशा अभंगाच्या गजरात आणि रामकृष्णहरी नामसंकीर्तनाच्या जयघोषात इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी अलोट गर्दी केली.
पंढरपूरला जाता न येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेले हे मंदिर दारणा नदीच्या काठी वसलेले असून, येथे दर्शन घेताना जणू काही चंद्रभागेच्या तीरावर असल्याचा अनुभव मिळतो.
या प्रसंगी पार्थ कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून पायी दिंडी काढत, टाळ-मृदुंगांच्या गजरात रिंगण करून हरिपाठाचा जल्लोष केला.
या मंगल दिवशी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे लोकप्रिय आमदार हिरामण दादा खोसकर यांनी पहाटे दर्शन घेत महा अभिषेक व महा आरती पार पाडली. चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने आमदारांचा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार खोसकर यांनी “इडा पिडा जाओ, बळीचं राज्य येवो” अशी प्रार्थना करत मतदारसंघासाठी चांगल्या दिवसांची कामना केली.वाळविहीर शिंदेवाडीचे भूमिपुत्र व विधान परिषद आमदार श्री. जगन्नाथ आप्पा शिंदे यांनीही मंदिरात येत दर्शन घेतले.
कार्यक्रमास घोटी पोलिस स्टेशनचे पि.आय. विजय शिंदे, इगतपुरीचे पि.आय. एस.व्ही. अहिरराव मॅडम, जिल्हा परिषद सदस्य गोरख भाऊ बोडके, ॲड. एन.पी. चव्हाण, ॲड. जि.पी. चव्हाण, सहा. आयुक्त महेशजी देवरे, उपसरपंच कमलाकर नाठे, तसेच डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. धनंजय चव्हाण, तुकाराम वारघडे, हभप बन्सीबुवा चव्हाण, हभप लक्ष्मणबुवा चव्हाण, मदन कडू, किरण मुसळे, माजी सरपंच हरिष चव्हाण, माजी उपसरपंच विनोद चव्हाण, दीपक चव्हाण , विजय चव्हाण, शिवाजी येलमामे, चंद्रशेखर येलमामे आणि गावातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला. माणिकखांबने आज खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूराचे रूप साकारले!
