मुंबई:राज्याच्या राजकारणात एक मोठा टप्पा ठरू शकणारी घटना आज घडली. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन शक्तीशाली पक्षांची औपचारिक युती आज मुंबईतील नरिमन पॉईंट येथे जाहीर करण्यात आली.
या ऐतिहासिक प्रसंगी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख मा. श्री. आनंदराज आंबेडकर हे प्रमुख उपस्थित होते.
शिंदे साहेबांनी आपल्या भाषणात म्हटले की, “ही युती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा एकत्र येण्याचा ऐतिहासिक क्षण आहे. ही युती विचार, विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारलेली असून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकासाठी काम करणारी ठरेल.”
या युतीमुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडून येईल, असा ठाम विश्वास मा. आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दीपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, आमदार प्रा. मनीषा कायंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सौ. शीतल म्हात्रे, उपनेत्या कलाताई शिंदे तसेच रिपब्लिकन सेना ईगतपुरी तालुकाध्यक्ष प्रविण साबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
ही युती केवळ निवडणूक आघाडी न राहता, महाराष्ट्राच्या भविष्याचा नवा अध्याय ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
