घोटी (ता. इगतपुरी, जि. नाशिक) :राज्य परिवहन महामंडळाच्या घोटी बस डेपो आगारात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक संडास-बाथरूम असूनही ते कुलूपबंद ठेवण्यात येतात, यामुळे महिला आणि नागरिक उघड्यावर लघवी करण्यास भाग पाडले जात आहेत.
या बाबत वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुक्याच्या वतीने तहसीलदार इगतपुरी यांना निवेदन देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की,“बस आगाराच्या प्रत्यक्ष पाहणीत घाणीचे साम्राज्य दिसून आले. शौचालय असूनही ते सार्वजनिक वापरासाठी खुले नाहीत. महिलांनीही स्पष्ट सांगितले की कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांचा उपयोग करता येत नाही.”
घोटी बस डेपो हे ठिकाण सुमारे २०० गावांचा केंद्रबिंदू असून, दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, महिला यांची वर्दळ असते. ठाणे, नगर, मुंबई आदी ठिकाणांची एसटी ये-जा करते. त्यातच शेजारी घोटी ग्रामीण रुग्णालय असतानाही दुर्गंधी आणि अस्वच्छता ही लाजीरवाणी बाब आहे.बस डेपोच्या मैदानात एक फूट खोल खड्डे असून, थोडी खडी टाकूनही ते बुजवले जाऊ शकतात, मात्र कोणीही लक्ष देत नाही. पावसात ही जागा तलावासारखी भरून जाते.
सदर निवेदन देण्यासाठी मिलिंद शिंदे (तालुका महासचिव),आकाश साळवे (घोटी शहर उपाध्यक्ष),डॉ. आर. वाय. गाडे, खंडू कोकणे, रमेश कोकणे, नामदेव कोकणे आदी वंचित बहुजन आघाडीचे पुढील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रती घोटी पोलीस निरीक्षक, बस डेपो अधिकारी, ग्रामपंचायत घोटी कार्यालय यांच्याकडे सुद्धा देण्यात आल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा इशारा:
“आठ दिवसांत डेपोची सफाई, संडास खुले व व्यवस्थापन सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडले जाईल. यास पूर्णपणे बस डेपो अधिकारी, कर्मचारी आणि शासन जबाबदार राहील.”
