नांदगाव (ता. इगतपुरी), दि. 26 जून 2025 -नांदगाव एस.एम.बी.टी. रोडवर वाडिवर्हे परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. ट्रक पलटी होऊन झालेल्या या दुर्घटनेत 1 जणाचा मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर जखमी, तर 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वाडिवर्हे येथून एस.एम.बी.टी. कडे जात असलेल्या ट्रकचा गोंदे फाटा जवळ अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रक उलटून अनेक प्रवासी जखमी झाले. 4 गंभीर जखमींना तात्काळ प्रायव्हेट वाहनांद्वारे एस.एम.बी.टी. धामणगाव हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्यातील एकाचा डॉक्टरांनी मृत घोषित केला.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत ॲम्बुलन्स सेवेद्वारे इतर किरकोळ जखमींना वाडिवर्हे P.A.C. शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून, घटनास्थळी नागरिकांनी मदतीचा हात दिला.
अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: 1. भारत त्रंबक बेंडकुळी (वय 35) 2. दीपक गणपत बेंडकुळी (वय 40). 3. पिंटू बाळू बेंडकोळी (वय 45). 4. समाधान हनुमंतराव वाघ (वय 36). 5. शांताराम दत्तू बेंडकोळी (वय 36, रा. गडगड सांगवी, ता. इगतपुरी, जि. नाशिक)
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ट्रकचा ताबा सुटल्यामुळे तो पलटी झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
