राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी):राहता तालुक्यातील साकुरी गावचे सुपुत्र व रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर, राहता येथील माजी शिक्षक प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांनी राहुरी फॅक्टरी येथील कृष्णा निवास्थानी दिनांक २३ जून २०२५ रोजी पंढरपूरच्या पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या श्रद्धाभावाने आणि भक्तिपूर्वक स्वागत केले.
सालाबादप्रमाणे यंदाही श्री. क्षेत्र जळगाव (गा.) येथून प्रारंभ झालेल्या दिंडी सोहळ्याचा मुक्काम कृष्णा निवास येथे पार पडला. ह.भ.प. निवृत्ती महाराज आळंदीकर यांच्या हरिपाठ, भजन, कीर्तन आणि प्रवचनांनी वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते. दिव्यांच्या रोषणाईत संध्याकाळचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
ही दिंडी दि. १४ जून २०२५ (ज्येष्ठ कृ.४) रोजी सुरू होऊन दि. ७ जुलै २०२५ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे सांगता होणार आहे. यामध्ये सहभागी झालेल्या साधू-संतांच्या सहवासात ‘जे का रंजले गांजले तयांसी म्हणे जो आपुले’ या संतवचनाची साक्ष देणारे आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर बनसोडे यांनी सपत्नीक महाप्रसादाच्या माध्यमातून भक्तांचे स्वागत करत वारकरी भाविकांची सेवा मनोभावे केली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत भक्तीरसात न्हालो.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ह.भ.प. निवृत्ती महाराज आळंदीकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पांडुरंगाच्या कृपेने हा भक्तिपूर्ण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
