महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 डिसेंबर 2022 च्या अधिसूचनेनुसार स्वतंत्ररित्या स्थापन करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाने आपल्या “100 दिवसांचा कृती आराखडा” अंतर्गत मोठे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील कार्यालये सुरू करण्याची दिशा निश्चित करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून 1 मे 2025 रोजी नाशिक जिल्ह्यात ‘जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय’ कार्यान्वित करण्यात आले आहे.
हे कार्यालय सामाजिक न्याय भवन आवारातील शासकीय अंधशाळेच्या इमारतीत कार्यरत झाले असून, यामध्ये दिव्यांग शाळा संहिता, 2016 च्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत निर्णय व नियमांची अंमलबजावणी, तसेच विविध शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. यापूर्वी ही कामे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यामार्फत केली जात होती.
श्री. भरत मगन चौधरी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, यांच्याकडे “जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी” या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. माधव वाघ, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विविध सरकारी अधिकारी, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग संस्था प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नवीन कार्यालयाच्या स्थापनेमुळे दिव्यांग बांधवांसाठी योजनांची अंमलबजावणी जलद व कार्यक्षम होणार असून, हे पाऊल सामाजिक समावेशकतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.
