इगतपुरी, १ मे २०२५ – महाराष्ट्र दिनी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातून मुंबईकडे जाणारे पाणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. जल जीवन योजनेतील अपूर्ण कामे, ठेकेदारांची मनमानी आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात हा तीव्र निषेध करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी विचारला – “जल जीवन योजना ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे का?”

जल जीवन योजना ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त आर्थिक सहभागातून राबवली जाणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला स्वच्छ व पुरेसे पाणी नळाद्वारे पुरवणे अपेक्षित होते. मात्र नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात – त्र्यंबक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा – येथे आजही अनेक वाडी, पाडे पाण्याविना आहेत.
प्रमुख आरोप: ग्रामसेवक व पाणीपुरवठा समित्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून कामे अपूर्ण ठेवली.पहिल्या टप्प्यातील कामे न करताच दुसऱ्या टप्प्याची बिले मंजूर केली जात आहेत.शाळा, आश्रमशाळा व अंगणवाड्यांनाही अद्याप पाण्याची सोय नाही.महिलांना आजही मैलोनमैल पाणी भरावे लागत आहे.
अपूर्ण कामांवर तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.सामाजिक लेखापरीक्षण करून पुढील बिले थांबवावीत.३१ मार्च २०२४ पूर्वी कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
