काळू गांगुर्डे, त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील वंचित, शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार, मच्छीमार, मेंढपाळ यांच्यासाठी सतत लढा देणारे माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात आणि निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याच्या निषेधार्थ हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र सलग सहा दिवस उपोषणामुळे भाऊंची तब्येत खालावली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, तसेच सरकारला सुबुद्धी यावी यासाठी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकराजा चरणी विशेष अभिषेक, महाआरती व प्रार्थना करण्यात आली.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्यावतीने महत्त्वपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. अनिल भाऊ भडांगे, तालुका अध्यक्ष श्री. नानासाहेब दोंदे, उपाध्यक्ष अनंत उपाध्ये, दिव्यांग जिल्हाध्यक्ष ललित भाऊ पवार, बच्चू निकाळजे, नितीन भाऊ गवळी यांचा समावेश होता.
