काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अद्याप लाभ न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे. अनेक लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन यादीत समाविष्ट असतानाही त्यांना अद्याप योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. याबाबत सतत पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत व पंचायत समितीकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी यामध्ये थेट हस्तक्षेप केला.
सुयोग वाडेकर, उपतालुकाध्यक्ष गोटीराम बोडके, जिल्हा चिटणीस राजाराम चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष अॅड. विजय महाले आणि सरचिटणीस श्रावण वड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज सादर करण्यात आला. या अर्जासोबत लाभार्थ्यांची यादी देखील देण्यात आली असून त्यामध्ये श्रावण वड, संतु खुताडे, मोहन गांगोडे, पांडुरंग वड आणि पुंडलिक गारे यांची नावे अग्रक्रमाने नमूद आहेत.या प्रकरणाची त्वरित चौकशी करून संबंधित लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांनी तत्काळ कारवाई न केल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
