इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात नुकतीच दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली आहे. श्री रविंद्र बंडू दोंदे (वय ५१), रा. कोरपगाव राजवाडा, तालुका इगतपुरी, यांनी घोटी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये पार्क करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
ही घटना २ जून २०२५ रोजी रात्री १० सुमारास घडली. सदर दुचाकी ही बजाज पल्सर 220 C.C, गाडी क्रमांक MH-15-KE-0973, काळ्या रंगाची असून, तिची किंमत सुमारे १,००,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दुचाकी केवळ चार महिन्यांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घरातील सदस्य उठल्यावर गाडी शेडमध्ये दिसून न आल्याने शोधाशोध करण्यात आली. मात्र, परिसरात व आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे ही चोरीची बाब स्पष्ट झाली.
या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.
