(प्रतिनिधी)
राहुरी फॅक्टरी येथील ‘कृष्णा’ या निवासस्थानी सोमवार, दिनांक २३ जून २०२५ रोजी एक भव्य आध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे. श्री क्षेत्र जळगाव (गा.) येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडी सोहळ्याचे स्वागत प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
प्रा. बनसोडे हे मूळचे राहता तालुक्यातील साकुरी येथील असून, सध्या ते राहुरी फॅक्टरी येथे वास्तव्यास आहेत. ते रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर, राहाता येथील माजी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. अध्यात्मिक कार्यात व सामाजिक सहभागामध्ये त्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असतो.
या पंढरपूर दिंडी सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी, शनिवार १४ जून २०२५ रोजी झाली असून, त्याची सांगता सोमवार ७ जुलै २०२५ रोजी पंढरपूर येथे होणार आहे. या काळात सोमवार २३ जून रोजी दिंडीचा मुक्काम राहुरी फॅक्टरी येथे होणार आहे. त्यानिमित्ताने भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन असे अनेक अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
प्रा. बनसोडे आणि त्यांच्या परिवाराने या दिंडी सोहळ्याच्या स्वागताचे संपूर्ण नियोजन महाप्रसाद व आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून केले असून, हे स्वागत सालाबादप्रमाणे याही वर्षी अत्यंत श्रद्धेने पार पाडले जाणार आहे.
“जे का रंजले गांजले तयांशी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा, देव तेथेच जाणावा” या संत विचारांवर चालत, प्रा. बनसोडे यांनी समाजासाठी सेवा आणि आध्यात्मिकतेचा आदर्श घालून दिला आहे.
या पवित्र सोहळ्याला परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे व त्यांच्या परिवाराने केले आहे.
