मुंबई | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्यभरातील एकूण १३० पुरस्कारार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यात ९० व्यक्ती आणि ४० संस्थांचा समावेश आहे.
या पुरस्कारांचे वितरण सोमवार, दिनांक १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या गौरव सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वर्षी ज्या नामांकित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार,कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार,संत रविदास पुरस्कार,शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार हे पुरस्कार सामाजिक न्याय, समता, बंधुता व प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जात असून, या माध्यमातून समाजकार्यातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेतली जाते.
