कोपरगाव/शिर्डी : “पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचे साधन नसून, ती समाजाला दिशा देणारी एक साधना आहे,” असे प्रतिपादन आत्मा मलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मलिकच्या पावन भूमीत दोन दिवसीय पत्रकार केडर कॅम्पला उत्साहात सुरुवात झाली.
या उद्घाटन प्रसंगी परमानंद महाराज, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परमानंद महाराज म्हणाले, “पत्रकारितेत मूल्य, विचार आणि आत्मजागृती यांचा समावेश झाला पाहिजे. शब्द हे राष्ट्रनिर्मितीचे साधन असून, त्यातून अज्ञानाचा नाश आणि लोकशाहीची सुदृढता शक्य आहे. पत्रकारांनी दररोज १५ मिनिटे ध्यान करून आत्मपरीक्षण करावे. त्यामुळे निर्णयक्षमता आणि संवेदनशीलता वाढते.”
आ. अमोल खताळ यांनी पत्रकारांवर असलेल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत सरकारच्या वतीने पत्रकार महामंडळ स्थापनेचे आश्वासन पुन्हा अधोरेखित केले. “मी हे आश्वासन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडेन,” असे ते म्हणाले.
बिपीन कोल्हे यांनी ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करत तंत्रज्ञानाच्या योग्य वापरावर भर दिला. “सत्य आणि असत्य यातील फरक अधोरेखित करत पत्रकारांनी समाजप्रबोधन करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ मदने यांनी केले, तर प्रास्ताविक ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले. यावेळी विविध मान्यवर व तज्ज्ञ उपस्थित होते.
