फोटोग्राफरची खरी ओळख: कोर्टाच्या कटघऱ्यातील एक प्रसंग,

बातमी शेअर करा.

आपण स्वतःला ‘प्रोफेशनल फोटोग्राफर’ म्हणतो, पण फोटोग्राफरची खरी ओळख नेमकी काय असते?

कदाचित, जोपर्यंत आपल्याला कोर्टात साक्ष देण्याची वेळ येत नाही, तोपर्यंत आपल्या व्यवसायाची मागची बाजू आणि त्याचे कायदेशीर वास्तव आपल्या लक्षात येत नाही. मला नुकताच कोर्ट कामासंदर्भातील फोटोग्राफीसाठी कोर्टाकडून समन्स आला होता आणि त्यानुषंगाने मला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात एका मोठ्या खटल्यासाठी साक्ष द्यावी लागली.

सिनेमातील कोर्ट आणि प्रत्यक्ष कोर्टाचा अनुभव
सिनेमांमध्ये आपण जसे कोर्टाचे सीन्स बघतो, अगदी तशीच परिस्थिती आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. माननीय न्यायाधीश, वकिलांची मोठी फौज आणि आजूबाजूला साक्ष ऐकण्यासाठी जमलेले लोक—हे सर्व वातावरण मी पहिल्यांदाच अनुभवले.

मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे याची मला जाणीव होती. म्हणूनच, माझा पेहराव आणि राहणीमान पूर्णपणे एका व्यावसायिक फोटोग्राफरसारखा ठेवूनच मी कोर्टात गेलो होतो.

वकिलांची उलटतपासणी आणि अस्तित्वाची जाणीव
जेव्हा मी कटघरात उभे राहून ‘देवा शप्पथ खरे सांगेन’ अशी शपथ घेतली, तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या ज्ञानाची आणि कागदपत्रांची परीक्षा सुरू झाली. समोरील पक्षाच्या वकिलांनी माझी उलटतपासणी सुरू केली. वकिलांचे प्रश्न इतके टोकदार असतात की तिथे तुम्हाला फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्येच उत्तर द्यावे लागते; त्यांना कुठलेही मोठे स्पष्टीकरण नको असते आणि ते ऐकूनही घेत नाहीत.

माझ्या फोटोग्राफीच्या संदर्भातील कागदपत्रे, स्टुडिओची माहिती, माझा कामाचा अनुभव आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर उलटतपासणी झाली. वकिलांच्या या उलट सुलट प्रश्नांना मी माझ्या अनुभवाच्या जोरावर आणि फोटोग्राफीच्या ज्ञानाआधारे सुमारे ९० टक्के प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. या संपूर्ण तासाभराच्या युक्तिवादानंतर मला जाणीव झाली की, आपण फक्त कॅमेरा हातात घेऊन व्यवसाय करतो, पण त्यामागील आपली कायदेशीर ओळख, अस्तित्व आणि कामाचा दर्जा याकडे आपले अनेकदा दुर्लक्ष होते.

एका प्रोफेशनल फोटोग्राफराजवळ काय काय असणे गरजेचे आहे?
आजच्या अनुभवातून मला समजले की, कॅमेरा आणि आपण एवढीच आपली ओळख जगाला दिसत असली, तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून खालील गोष्टी असणे अत्यंत गरजेचे आहे:

कायदेशीर दस्तऐवज: शॉप ॲक्ट लायसन आणि पक्के बिल बुक.

शैक्षणिक पात्रता: फोटोग्राफीचा कोर्स किंवा डिग्रीचे सर्टिफिकेट.

व्यावसायिक पुरावे: फोटोग्राफी संस्थेचे सदस्य असल्याचा पुरावा किंवा आयकार्ड.

उपकरणांची कागदपत्रे: कॅमेराचे तपशील आणि खरेदी केलेले अस्सल बिल

वैयक्तिक व वित्तीय कागदपत्रे: अनुभवाचे सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न, स्टुडिओचा अधिकृत पत्ता.

व्यवसाय ओळख: प्रोप्रायटरचा सही-शिक्यासह अधिकृत शिक्का.

तांत्रिक स्पष्टता: फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचे छेडछाड (Editing) न केलेले अस्सल पुरावे आणि फोटोवर तांत्रिक स्पष्टीकरण देण्याची क्षमता.

समाधानाची पावती
साक्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मला माझ्या स्पष्ट आणि अचूक उत्तरांबद्दल शाबासकी दिली. एका मोठ्या कोर्टात, ३०० पेक्षा जास्त लोकांसमोर आपल्या व्यवसायाची आणि अस्तित्वाची साक्ष देऊन त्यात यशस्वी होण्याचा आनंद खरोखरच वेगळा होता!

लेखक: संजय जगताप, (छायाचित्रकार नाशिक,)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *