त्र्यंबकेश्वर (ता. 14 मे 2025):
आज त्र्यंबकेश्वर बस स्थानकावर एक आदर्श आणि प्रेरणादायी घटना घडली. अनंता गणेश अंजोळे, राहणार खामगाव, हे जव्हार आगाराच्या बसने प्रवास करून त्र्यंबकेश्वर येथे उतरले असताना त्यांची ब्लॅक रंगाची बॅग बसमध्ये विसरली गेली होती. सदर प्रवाशाने त्वरित त्र्यंबकेश्वर बस स्थानकावरील हरीश तूपलोंढे, वाहतूक नियंत्रक अशोक बोंबले, तसेच सहकारी विष्णू वाघ व उत्तम गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.
हरीश तूपलोंढे यांनी प्रवाशाकडून तिकीट तपासले असता, त्यांनी जव्हार आगाराच्या बसने प्रवास केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ जव्हार आगाराच्या एटीएस सौ. उषा घुगे मॅडम यांच्याशी संपर्क साधून बसच्या वाहकाचा संपर्क क्रमांक मिळवला. त्या वाहकाला कॉल करून बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे ब्लॅक रंगाची बॅग असल्याची माहिती दिली. वाहकाने बॅग असल्याचे कळवले.
हरीश तूपलोंढे यांनी बॅगमध्ये सुमारे सतराहजार रुपये व कपडे असल्याची माहिती देत ती त्र्यंबकेश्वर बस स्थानकावर पाठवून देण्याची विनंती केली. साधारणतः एका तासात बॅग बस स्थानकावर आली. अनंता गणेश अंजोळे यांनी आपली बॅग ओळखून तिची खात्री दिल्यानंतर ती त्यांच्या ताब्यात सुपूर्त करण्यात आली.वाहतूक नियंत्रक ए. पी. बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली ही घटना एस. टी. महामंडळाच्या प्रामाणिक सेवाभावाचे प्रतिक ठरत असून, प्रवाशांच्या मनात विश्वासाचे स्थान अधिक दृढ करणारी आहे.
