गोंदे फाटा (दि. 19 एप्रिल 2025):नासिक-मुंबई आग्रा महामार्गावर जिंदाल कंपनीजवळ आज सायंकाळी 4.15 वाजता एक भीषण अपघात घडला. नासिकहून मुंबईकडे जात असलेल्या कार (क्र. MH.17.DC.2343) आणि बोलोरो (क्र. MH.06.AW.4329) या दोन वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून चार ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाट्याजवळ तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे दिपाली दत्तात्रय देशमुख (वय 34), तेजल बाळासाहेब घिघे (वय 18), ज्ञानेश्वरी बाळासाहेब घिघे (वय 19), सुरेखा बाळासाहेब घिघे (वय 30), अनंत देवराम कांबळे (वय 41) , बाळासाहेब घिघे यांचा आठ वर्षांचा मुलगा हे सर्व जखमी राजूर, अकोला (जिल्हा अहमदनगर) येथील रहिवासी आहेत.अपघाताचे प्राथमिक कारण अद्याप स्पष्ट नसले तरी वाहनांची वेगात असलेली धडक हे कारण मानले जात आहे.दरम्यान, नरेंद्राचार्य महाराज संस्थेची मोफत रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांसाठी पुन्हा एकदा संजीवनी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
