पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांना लवकरच चोख प्रत्त्युत्तर मिळेल, सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल: संरक्षण मंत्री. “प्रत्येक भारतीय एकजूट आहे, अशा दहशतवादी कारवाया आम्हाला कधीही घाबरवू शकत नाही”

Oplus_131072

बातमी शेअर करा.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना भारतीय भूमीवरील त्यांच्या दुष्कृत्यांचे लवकरच चोख प्रत्त्युत्तर मिळेल. 23,एप्रिल 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्यावरील स्मृति व्याख्यानात संरक्षण मंत्र्यांनी दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भारताच्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला आणि नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आवश्यक आणि योग्य ती सर्व पावले उचलेल.

“भारत ही एक प्राचीन संस्कृती आणि एवढा मोठा देश आहे ज्याला अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांनी कधीही घाबरवता येणार नाही. या भ्याड कृत्याविरुद्ध प्रत्येक भारतीय एकजूट आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांच्यापर्यंतच नव्हे तर ज्यांनी पडद्यामागे राहून भारतीय भूमीवर अशी कुटील कट कारस्थाने रचली त्यांनाही लवकरच योग्य उत्तर मिळेल,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

सीमेपलीकडून समर्थित दहशतवादी घटनांच्या संदर्भात, संरक्षण मंत्री म्हणाले, “इतिहास हा राष्ट्रांच्या विनाशाचा साक्षीदार आहे जो शत्रूच्या कृतीमुळे नाही तर त्यांच्या स्वतःच्या दुष्कृत्यांमुळे नष्ट होतो. मला आशा आहे की सीमेपलीकडील लोक इतिहासातील या धड्यांकडे अधिक बारकाईने पाहतील.”

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रति राजनाथ सिंह यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या. “धर्माला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले आहे. या घोर अमानवी कृत्यामुळे आपण सगळेच शोकसागरात बुडालो आहेत. या दुःखद प्रसंगी, दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी मी प्रार्थना करतो,” असे ते म्हणाले.त्यानंतर, संरक्षणमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि समर्पण अतुलनीय असल्याचे ते म्हणाले. “ते एक दूरदर्शी लष्करी नेते होते जे आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्यासारख्या लष्करी नेत्यांच्या दूरदृष्टी आणि नीतीमत्तेमुळे आज भारतीय हवाई दल जगातील सर्वात बलवान हवाई दलांपैकी एक आहे ” असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *