१५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळा आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या विशेष प्रसंगी देशाच्या निवडणूक व्यवस्थेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपतींना “इंडिया व्होट्स 2024: अ सागा ऑफ डेमोक्रसी” या पुस्तकाची पहिली प्रत सादर केली.
कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी भारतीय लोकशाहीच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी, वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि संवेदनशील लोकशाही असून तिच्या यशस्वी कार्यप्रणालीमुळे अनेक देश प्रेरणा घेत आहेत. त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेतील समावेशकतेचे विशेष कौतुक केले आणि महिलांचा वाढता सहभाग देशाच्या प्रगतीचा द्योतक असल्याचे नमूद केले. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि दुर्गम भागातील आदिवासी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रपतींनी मतदारांना लोकशाहीवर अढळ विश्वास ठेवण्याचे आणि भेदभाव, प्रलोभनांपासून मुक्त राहून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. सुजाण मतदार लोकशाहीस बळकटी देतात, हे नमूद करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार प्रतिज्ञेचे महत्त्वही अधोरेखित केले.
२०११ पासून निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांचा लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हे आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतातील निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि समावेशक बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राष्ट्रीय मतदार दिन देशभरात लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करत, नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी एक प्रेरणादायी दिवस ठरतो आहे.
